
प्रतिनिधी | राजेश चौधरी, प्रदिप कुळकर्णी

सावदा व वडताल धाम येथे महिनाभर चालणार भव्य सोहळा; आकर्षक पाळण्यांतून घडणार भगवंताचे दर्शन
हिंदू संस्कृतीत व्रत, वैकल्ये आणि भक्तीचा पवित्र मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच महिन्यात नैसर्गिक पावसाच्या धारा व त्या द्वारा निसर्ग हिरवा शालू नेसून भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज होत असतो. या पर्वाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिरांमध्ये साजरा होणारा ‘हिंडोळा उत्सव’ (पाळणा उत्सव). हा उत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, जीव आणि शिव यांच्यातील अगाध प्रेम, वात्सल्य आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. या संदर्भातील मिराबाईचे सुंदर वर्णन खालील प्रमाणे आहे.
सावन मास सुहावना आयो रे, बादल उमड़-घुमड़ घर आयो रे।
हरि के संग हिंडोरे झूलूँ, सब सुख पायो रे, मीरा के प्रभु गिरधर नागर, चरणन चित लाटायो रे।

उत्सवाचा इतिहास आणि सद्भावना
पौराणिक काळापासून ब्रजभूमीत भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-गोपाळांनी या उत्सवाची सुरुवात केली, असे मानले जाते. राधा-कृष्णाच्या बाल आणि किशोर रूपातील लीलांचे स्मरण करत, गोपी याच श्रवण महिन्यात आपल्या हातांनी विविध प्रकारच्या वस्तूंचे पाळणे बनवून भगवंताला झुलवत असत. यात वात्सल्य आणि भक्तीची पराकोटी पाहायला मिळते. श्रीमद्भागवत आणि अष्टादश पुराणांमध्येही या लीलाविलासाचे विशेष वर्णन आढळते.
भगवंताच्या चरणी अपार भक्ती समर्पित करून त्यांना पाळण्यात झुलवल्याने भक्तांचे मन संसाराच्या तापापासून मुक्त होऊन शांत होते, अशी श्रद्धा आहे.
राधामाधवयोर्युग्मं दोलायां संस्थितं मुदा।
गायन्त्यो मधुरं गीतं गोपिका दोलयन्ति तौ॥

विविध संप्रदायांत हिंदोळा उत्सवाचे स्वरूप
भारतात विशेषतः वैष्णव, वारकरी आणि स्वामिनारायण संप्रदायामध्ये हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांनी भक्तीच्या आनंदात भगवंताला साद घातली आहे.
रुक्मिणी स्वयंवराची गोडी, विठ्ठलाची मूर्ती साजरी भोळी।
पाळण्यामध्ये झुलतो पांडुरंग, भक्तांना मिळे परमानंद॥
दुसरीकडे, स्वामिनारायण संप्रदायात या उत्सवाला विशेष आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वतः भगवान स्वामिनारायण यांनी भुज, अहमदाबाद आणि वडताल येथे या उत्सवाला सुरुवात करून भक्तांना आनंदित केले होते.
वडताल धाम आणि सावदा येथे महिनाभर सोहळा
स्वामिनारायण संप्रदायाचे मुख्य गादी स्थान असलेल्या गुजरातमधील ‘वडताल धाम’ येथे संपूर्ण श्रावण महिनाभर हा उत्सव अतीव आनंद आणि कीर्तन-भक्तीच्या गजरात साजरा केला जातो. येथे भगवंताला झुलवण्यासाठी दररोज सुवर्ण, चांदी, चंदन इ. पवित्र लाकूड, ताजी फुले, फळे, धान्य, तसेच चलनी नाणे व मोत्यांचे अत्यंत आकर्षक आणि कल्पक विविध पाळणे साकारले जातात. देशभरातून लाखो हरिभक्त या दिव्य दर्शनाचा लाभ घेतात.
वडताल संस्थानचे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि जागृत स्थळ असलेल्या सावदा (जि. जळगाव) येथील श्री स्वामिनारायण मंदिरातही परंपरेनुसार महिनाभर हा उत्सव भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होतो. येथेही सुवर्ण, चांदी आणि पवित्र काष्ठापासून निर्मित पाळण्यांमध्ये भगवंताला झुलवले जाते.
झूल रे हिंडोले झुलावू घनशाम, वडताल पुर के स्वामी, अक्षरधाम के धाम।
सुवर्ण मोती हीरा जटित हिंडोला बनायो, हरिभक्त मिल मंगल गावत, मन हर्षायो…झूल रे हिंडोले…
अश्या प्रकारे संध्याकाळी संगीतमय कीर्तन, प्रवचन, महाआरती आणि भक्ती सोहळा संपन्न होतो. परिसरातील हजारो भाविक या अलौकिक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात.
शास्त्री भक्तिस्वरूपदासजींचे आवाहन:
“भगवान श्रीकृष्ण, राधाजी, गोपी-गोपाळ आणि स्वामिनारायण भगवान यांच्यातील निस्सीम प्रेमभावनेचे आणि भक्तांच्या भक्तीचे हे जिवंत प्रतीक आहे. हा उत्सव म्हणजे केवळ पाळणा हलवणे नसून, आपल्या मनातील अशुद्ध विचार बाजूला सारून मन भगवंताच्या चरणी जोडणे आहे. भाविकांनी जवळच्या मंदिरात जाऊन या दिव्य हिंडोळा उत्सवात सहभागी व्हावे आणि मानवी जीवन कृतार्थ करावे.”

लेखक: शास्त्री भक्तिस्वरूपदासजी



