
प्रतिनिधी | राजेश चौधरी, प्रदिप कुळकर्णी
सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावपरिसरातील गोठ्यातून तीन बैलजोड्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावदा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीला गेलेल्या तीन बैलजोड्यांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावखेडा बुद्रुक येथील गोठ्यातून ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या तीन बैलजोड्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ६ ऑगस्ट रोजी संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, संशयित आरोपी आदेश खान एजाज खान (वय २०, रा. खजानगर, सावदा) आणि शेख हयात शेख मासूम (वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला. तसेच या गुन्ह्यात शेख नासीर शेख चाँद कुरेशी (वय ४२, रा. वरणगाव) आणि शेख राजिक (रा. रसलपूर) हे देखील सामील असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीनही बैलजोड्या जप्त करून मूळ मालकांना परत केल्या आहेत. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (क्रमांक MH.१९ CX १६६७) आणि २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH.१९ ES ६६११) असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील तीन आरोपींना अटक करून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर चौथा आरोपी शेख राजिक याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक राहुल सानप, जयराम खोडपे, निलेश बाविस्कर, मेहेरबान तडवी, संजीव चौधरी, अतुल तडवी, संजय तडवी आणि नामदेव कापडे यांच्या पथकाने केली आहे.



