
सावदा प्रतिनिधि – प्रदीप कुळकर्णी व राजेश चौधरी
आषाढ शुद्ध द्वितीयेनिमित्त, जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील श्री स्वामीनारायण देवस्थानच्या वतीने भव्य ‘रथयात्रा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत देवाचे दर्शन घेतले.
या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, नेहमी आपण देवाच्या दर्शनासाठी जातो, परंतु या पवित्र दिवशी स्वतः ‘भगवान जगन्नाथ’ आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिराबाहेर पडतात, अशी श्रद्धा आहे. मंदिरातून निघालेली ही रथयात्रा नगरातून फिरत भक्तांच्या भेटीला आली. यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या साधू-संत आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वच भाविकांनी अत्यंत भक्तीभावाने या रथाचे स्वागत केले.याप्रसंगी बोलताना स्वामीनारायण देवस्थानचे प्रतिनिधी म्हणाले की, भगवान स्वामीनारायण यांनीही आपल्या बालपणी पदयात्रेच्या माध्यमातून जनमानसात जाऊन दर्शन दिले होते. त्याच परंपरेचा भाग म्हणून, आजच्या या रथाच्या माध्यमातून आपण ही ‘नगरयात्रा’ साजरी करत आहोत.
देवाचे आशीर्वाद भक्तांच्या हृदयापर्यंत पोहोचावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.परंपरा आणि भक्तीचा सुंदर संगम या रथयात्रेत दिसून आला. यानिमित्ताने देवस्थान परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
