

सावदा प्रतिनिधी – प्रदीप कुळकर्णी, राजेश चौधरी
आषाढी वारीच्या परंपरेत भक्तीचा महासागर ओसंडून वाहत असतो. या वारीत हजारो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या ओढीने येत असतात. मात्र, या वारीत एका अशा डॉक्टरांची सेवा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे, जे स्वतः गेली दहा-अकरा वर्षांपासून संधिवात (Rheumatoid Arthritis) सारख्या अत्यंत वेदनादायी आणि दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत. हे डॉक्टर आहेत सावदा येथील डॉ. संजय भास्कर भंगाळे. स्वतःच्या शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांनी ‘सेवा हीच ईश्वरसेवा’ मानून वारकऱ्यांसाठी सुरू ठेवलेली ही वैद्यकीय सेवा खरोखरच प्रेरणादायी आहे.
हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हभप धनराज महाराज यांच्या नेतृत्वात निघालेली ही दिंडी श्रीक्षेत्र अंजाळे येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. सुमारे १२०० वारकरी सहभागी असलेल्या या दिंडीत डॉ. संजय भंगाळे आपल्या पत्नी माधुरी भंगाळे यांच्यासह सहभागी झाले आहेत. संधिवातामुळे त्यांना चालणे, बसणे कठीण जाते; हाताची बोटे नीट हलवता येत नाहीत. खुर्चीशिवाय त्यांना बसणे अशक्य असते. अशा परिस्थितीतही ते आपल्या वैयक्तिक चारचाकी वाहनातून वारीत सहभागी झाले आहेत.

डॉ. भंगाळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना औषधे, इंजेक्शन, सलाईन यांसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे विनामूल्य देत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी लागणारा सर्व खर्च ते स्वतः करत आहेत. वारीच्या प्रवासात औषधांचा साठा संपला असता, त्यांनी कोणतीही सबब न सांगता तात्काळ नवीन साठा मागवून घेतला, जेणेकरून वारकऱ्यांच्या सेवेत कोणताही खंड पडू नये.

डॉ. संजय भंगाळे यांच्या या असामान्य कार्याची दखल घेत दिंडीचे मुख्य गादीपती हभप धनराज महाराज यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. बोधेगाव (फुलंब्री) येथे आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा व महंत स्वरूपानंद महाराज यांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
“डॉक्टर स्वतः आजाराने त्रस्त असताना इतरांच्या वेदना दूर करण्यासाठी जो निस्वार्थ भाव दाखवत आहेत, तो वाखाणण्याजोगा आहे,” अशा भावना वारीतील इतर वारकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. या डॉक्टरांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांची सेवा अशीच अविरत सुरू राहावी, अशी प्रार्थना वारकऱ्यांकडून पांडुरंगाच्या चरणी केली जात आहे.

