
प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
हिंदू धर्मपरंपरेतील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या चातुर्मास पर्वाची सुरुवात यंदा शनिवार, २५ जुलै रोजी आषाढ शुद्ध एकादशी (देवशयनी एकादशी) पासून होत आहे. आध्यात्मिक साधना, आत्मसंयम, उपासना आणि सात्त्विक जीवनशैली यांना समर्पित असलेला हा चार महिन्यांचा कालखंड धार्मिक तसेच आरोग्यदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवसापासून भगवान श्रीविष्णू योगनिद्रेत जातात, अशी पौराणिक कथा असून त्यानिमित्ताने देशभरातील मंदिरे, मठ आणि धार्मिक संस्थांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भगवान श्रीविष्णूंच्या योगनिद्रेची पौराणिक कथा

धार्मिक ग्रंथांनुसार, आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. त्यामुळे या एकादशीला देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी असे संबोधले जाते. या दिवशी श्रद्धापूर्वक उपवास, जप, पूजन आणि दानधर्म केल्यास पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शास्त्रांमध्ये या दिवसाचे वर्णन पुढील श्लोकाद्वारे करण्यात आले आहे –
“सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदम्।
विबुद्धे त्वयि बुद्धं च जगन्मेषादिमण्डले॥”
अर्थ : हे जगन्नाथ! आपण योगनिद्रेत गेल्यावर संपूर्ण विश्व स्थिर होते आणि आपण जागृत झाल्यावर पुन्हा सृष्टीचे कार्य गतिमान होते.
महाराष्ट्रातील आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी

विशेषतः महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पवित्र दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत येतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांसारख्या महान संतांच्या पालख्या आणि दिंड्या ऊन-पावसाची तमा न बाळगता ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या अखंड गजरात पंढरीत दाखल होतात.
शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेला हा वैष्णवांचा मेळा आणि चंद्रभागेच्या तीरावरील भक्तीचा महासागर हे महाराष्ट्राच्या भागवत परंपरेचे एक अद्भूत आणि विलोभनीय रूप आहे. आषाढी एकादशीला सावळ्या विठूरायाच्या चरणी माथा टेकवून वारकरी आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याची अनुभूती घेतात. वारीची ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा समता, भक्ती आणि निस्सीम श्रद्धेचे प्रतीक आहे.
धार्मिक उत्सवांसह आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
चातुर्मासामध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन या चार महिन्यांचा समावेश होतो. या कालावधीत गुरुपौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्रोत्सव, विजयादशमी यांसारखे अनेक महत्त्वाचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात.
वैज्ञानिक महत्व
धार्मिक महत्त्वाबरोबरच चातुर्मासाचा वैज्ञानिक दृष्टिकोनही महत्त्वाचा मानला जातो. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे उपवास, सात्त्विक आहार, संयमित दिनचर्या आणि नियमित साधना यांचा शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होतो. हा काळ आत्मपरीक्षण, मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त असल्याचे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे.
भगवान श्री स्वामिनारायणांची चातुर्मासाबाबत विशेष आज्ञा

भगवान स्वामिनारायण यांनी शिक्षापत्री मध्ये चातुर्मासा मध्ये नियमांचे पालन करण्याचे विशेष महत्त्व स्पष्ट केले आहे. शिक्षापत्रीतील श्लोक क्रमांक ७६ मध्ये ते म्हणतात –
“विशेषनियमो धार्यश्चातुर्मास्येऽखिलैरपि ।
एकस्मिन् श्रावणे मासि सत्वशक्तैस्तु मानवैः ।।७६।।”
अर्थ : सर्व भक्तांनी चातुर्मासात विशेष व्रत-नियमांचे पालन करावे. मात्र, सलग चार महिने नियम पाळणे शक्य नसल्यास किमान श्रावण महिन्यात तरी श्रद्धेने नियमांचे पालन करावे.
भगवान श्री स्वामिनारायणांचा हा संदेश भक्तांना त्यांच्या सामर्थ्यानुसार सातत्यपूर्ण साधना आणि ईश्वरभक्ती करण्याची प्रेरणा देतो.
देवउठी एकादशीला चातुर्मासाची सांगता
कार्तिक शुद्ध एकादशीला देवउठी (प्रबोधिनी) एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीविष्णू योगनिद्रेतून जागृत होतात, अशी श्रद्धा असून याच दिवशी चातुर्मासाची सांगता होते. त्यानंतर विवाह, गृहप्रवेश यांसारख्या मंगलकार्यांना पुन्हा प्रारंभ होतो.
हरिभक्तांना सात्त्विक जीवनाचा संदेश
चातुर्मास हा केवळ धार्मिक विधींचा काळ नसून आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीचा महोत्सव आहे. या कालावधीत सर्व एकादशी व्रते श्रद्धेने पाळणे, मदिरापान मांसाहार यांसारख्या तामसिक आहाराचा त्याग करणे, नित्य पूजा, सत्संग, शास्त्राध्ययन आणि भगवंताच्या नामस्मरणात अधिक वेळ व्यतीत करणे, यामुळे मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते.
शास्त्री स्वामी भक्तीस्वरूपदासजी यांनी सर्व हरिभक्तांना आवाहन केले आहे की, चातुर्मास हा आत्मपरिवर्तनाचा आणि ईश्वरभक्तीचा अमूल्य कालखंड समजून प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार व्रत, नियम आणि सत्संगाचे पालन करावे. भगवान स्वामिनारायण सर्वांना सद्बुद्धी, उत्तम आरोग्य आणि दृढ भक्ती प्रदान करो, अशी त्यांनी प्रार्थना व्यक्त केली.

लेखक : शास्त्री स्वामी भक्तिस्वरूपदासजी
(श्री स्वामिनारायण गुरुकुल, कोशिंद्रा)


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

