चिनावल येथील विद्यार्थी वारकऱ्यांकडून पालखी मिरवणूक; मैदानावर रंगतदार रिंगण सोहळा

 

प्रतिनिधी | चिनावल 

 

 

आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त चिनावल ता. रावेर येथील नूतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचा अनुभव घेत वारकरी वेशभूषा परिधान करून उत्साहात पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन केले. रिमझिम पावसाचा आनंद घेत या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, भगवे झेंडे घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील महाजन, चेअरमन खेमचंद्र पाटील आणि सेक्रेटरी गोपाळ पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत दिसले संतांचे लोभस रूप हातात टाळ – मृदंग आणि पखवाज घेऊन मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण व अभंग गाणारे बाल वारकरी ! कोणी संत ज्ञानेश्वर, कोणी संत तुकाराम तर कोणी साक्षात विठ्ठल-रुक्मिणीच्या सुंदर वेशभूषेत अवतरले होते. विद्यार्थ्यांसोबत प्रमुख मान्यवर व शिक्षकांनीही या आनंद सोहळ्यात तल्लीन होऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आषाढी एकादशीचा संदेश दिला.

 

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य मनोहर पाटील, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संदीप चौधरी, नूतन प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य गणेश बाविस्कर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जगदीश धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यालयीन कर्मचारी वैभव महाजन यांनीही नियोजनात मोलाचे योगदान दिले.

 

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेचे विचार, वारकरी संप्रदायाची संस्कृती, भक्ती, समता, एकात्मता आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला. उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

 

या बातमीचे प्रायोजक आहे. 
सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!