आषाढी एकादशीनिमित्त न.पा.संचालित शाळांची भक्तिमय वातावरणात निघाली दिंडी‎

प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी

 

“ज्ञानबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या जयघोषात तसेच हरिनामाच्या गजरात संपूर्ण सावदा नगरी भक्तिरसात न्हावून निघाली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येथील श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल आणि पीएमश्री श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर यांच्या संयुक्त वतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी काढलेल्या पारंपरिक दिंडीने शहरवासीयांचे मन जिंकले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी परंपरांचे अत्यंत आकर्षक आणि जिवंत दर्शन घडले. दिंडीत इयत्ता पाचवी पासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभाग घेत विठ्ठलनामाचा गजर, अभंग, टाळ-मृदंगाच्या साथीने भक्तिमय वातावरण निर्माण केले.

 

आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध रूपे साकारली होती.  यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह  महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख सांगणाऱ्या वेशभूषा विशेष आकर्षण ठरल्या. काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर मंगल कलश घेतला होता, तर काहींनी हातात धार्मिक ग्रंथ व विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. 

 

 

ही दिंडी शाळेपासून निघून शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत गांधी चौक परिसरातील विठ्ठल मंदिरात पोहोचली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लेझीम, पावली यांसारखे पारंपरिक खेळ अत्यंत उत्साहात सादर केले. संगीताच्या आणि ढोलाच्या तालावर चिमुकल्यांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केलेल्या शिस्तबद्ध सादरीकरणाला पालक तथा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला. संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

 

विद्यार्थ्यांच्या या सांस्कृतिक व धार्मिक सहभागाचे कौतुक करण्यासाठी सावदा नगरपरिषदेचे व परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सावदा नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील, शिक्षण समिती सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे, नगरसेवक रेखा राजेश वानखेडे, सिमरन राजेश वानखेडे, रंजना जितेंद्र भारंबे, विजया कुशल जावळे, विशाल भागवत सोनवणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

दिंडीचा हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडल्यानंतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा शाळेत परतत नियमित शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन करण्यासाठी श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जी. भालेराव आणि पीएमश्री श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने सावदा शहरात संस्कृती आणि एकात्मतेचा संदेश दिला.

 

या बातमीचे प्रायोजक आहे. 
सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!